इंडोनेशियन प्रवाह : महासागरातील नदी जी भारतीय मान्सूनच्या पावसावर परिणाम करते.
सामान्यमाणूस आणि इंडोनेशियन प्रवाह या दोन काल्पनिक पात्रांमधील संवादाच्या माध्यमातून इंडोनेशियन प्रवाहाची वैशिष्ट्ये, महत्त्व आणि त्याचा जागतिक हवामान व महासागरी प्रवाहांवर होणारा प्रभाव सोप्या व संवादात्मक शैलीत उलगडणारा एक माहितीपूर्ण लेख.

- Dr. Vivek Shilimkar
- 6 min read

हवामान हा जगभरात सर्वाधिक चर्चिला जाणारा आणि फॉलो केला जाणारा विषय आहे. एल निनो – ला निना सारख्या अनेक हवामानविषयक घटना आहेत आणि त्यांचे परिणाम जगभरात प्रसिद्ध आहेत. एल निनो – ला नीना भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण त्याचा मान्सून हंगामातील पावसावर आणि अखेरीस, नदीतील जलस्रोतांवर आणि शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होतो. पावसाचा नदीतील जलस्रोतांवर परिणाम होतो हे सामान्य समज आहे. तथापि, ही एका नदीची कथा आहे जी पावसाळ्यात भारतातील पावसावर परिणाम करू शकते. जमिनीवरील नद्यांच्या विपरीत, ही नदी महासागरात वाहते आणि ती तुम्हाला माहीत असलेल्या कोणत्याही नदीपेक्षा हजारो पट मोठी आहे.
नमस्ते सामान्य माणसा! मी इंडोनेशियन प्रवाह आहे; तु मला ITF म्हणू शकतोस.
सामान्य माणूस: इंडोनेशियन प्रवाह?! हे कोणत्या प्रकारचे नाव आहे?
ITF: मला हे नाव देण्यात आले कारण प्रशांत (Pacific) आणि हिंदी (Indian) महासागरांच्या समुद्र पातळीतील फरकामुळे प्रशांत महासागरातून हिंदी महासागरात मी इंडोनेशियाच्या बेटांमधून वाहतो. जशा नद्या जमिनीवर उंचावरून सपाटीकडे वाहतात. पॅसिफिक महासागर माझ्या ईशान्येला आहे, तिथे प्रशांत महासागरातील व्यापारीवाऱ्यांमुळे महासागराची पातळी नेहमीच माझ्या नेऋत्येला असलेल्या हिंद महासागरापेक्षा जास्त असते. या दोन महासागरांच्या पातळीतील फरकामुळे पृथ्वीच्या उष्णकटिबंधीय प्रदेशातील पाण्याचे सर्वात मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होते आणि माझा म्हणजेच इंडोनेशियन प्रवाहाचा जन्म होतो.
समुद्रातील एक नदी
सामान्य माणूस: तू किती मोठा आहेस? प्रशांत महासागरातून हिंदी महासागरात तू किती क्युसेक किंवा गॅलन पाणी हस्तांतरित करतोस?
ITF: मी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी हस्तांतरित करतो की तुमचे पारंपारिक माप, जसे की क्युसेक (क्यूबिक फूट प्रति सेकंद), आणि गॅलन फार लहान पडतात. जर तुम्ही या मोजमापांचा वापर केलात तर तुम्हाला माझी विशालता सहजासहजी समजणार नाही. म्हणून, शास्त्रज्ञ हॅराल्ड स्वरड्रूपने त्याच्या नावावरून एक युनिट शोधून काढले, स्वेरड्रप, समतुल्य – “दशलक्ष घनमीटर प्रति सेकंद.” मला माहित आहे की तू हरवला आहेस; मी तुला “स्वरड्रूप” म्हणजे काय हे समजावून सांगतो.
100 मीटर रुंद, 10 मीटर खोल आणि 2 मीटर प्रति सेकंद वेगाने वाहणाऱ्या नदीची कल्पना करा. पुण्याच्या गरवारे कॉलेज जवळ मुठा नदीचे पात्र साधारण याच आकाराचे आहे. आता, अशा 500 नद्या एकत्र करा – त्यासर्व ५०० नद्या मिळून एक Sverdrup होते आणि माझा आकार 18-22 Sverdrup आहे. म्हणजेच मी प्रशांत महासागरातून हिंदी महासागरात वर मुठा नदीसारख्या 10,000 नद्यांची वाहतूक करतो. तथापि, मी पृथ्वी वरील सर्व महासागरांचा फक्त एक अंश आहे. मला आशा आहे की किमान पृथ्वीवर तू किती नगण्य आहेस याचा अंदाज तुला आला असेल.
आकृती क्र. २ : पुण्यातील मुठा नदी. पिवळ्या रंगाची पट्टी १००मीटर रुंद अंतर दर्शवते.
सामान्य माणूस: अरे बापरे! मी अनेकवेळा महासागर पाहिला आहे, पण या दृष्टीकोनातून मी कधीच पाहिला नव्हता . मला माहीत नाही की मी समुद्राची विशालता कधी समजून घेऊ शकेन.
भारतीय मान्सून पाऊस आणि मी
ITF: असो, मी हिंद महासागरात सुमारे 20 Sv पाणी वाहून नेत असताना, हिंद महासागराची क्षारता कमी करतो आणि तापमान वाढवतो, ज्यामुळे भारतात मान्सून मध्ये पडणाऱ्या पावसावर परिणाम होऊ शकतो.
जरी पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाण सुमारे 20 Sv असले, तरी माझा प्रवाह कमी जास्त होत असतो. माझा प्रवाह सरासरीपेक्षा अधिक असताना, दक्षिण हिंद महासागराची क्षारता सरासरीपेक्षा कमी होते आणि तापमान वाढते, परिणामी दक्षिण हिंद महासागरात अधिक बाष्पीभवन होते आणि वातावरणाचा दाब कमी होतो. याउलट परिणाम प्रवाहाचे प्रमाण कमी असताना असतो.
सामान्य माणूस: अच्छा, मला वाटते की मला ते समजले, पण त्याचा भारतीय मान्सूनच्या पावसावर कसा परिणाम होतो?
ITF: चांगला प्रश्न आहे. भारतावर पाऊस पाडणारे वारे दक्षिण हिंद महासागरात उगम पावतात. ते दक्षिण हिंद महासागरातून बाष्प वाहून नेतात आणि ते बाष्प पावसाच्या रूपात भारताच्या पश्चिम भागावर / पश्चिम घाटावर पडते. त्यामुळे, जेव्हा माझा प्रवाह सरासरी पेक्षा जास्त असतो, तेव्हा पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते, परिणामी हवेत सरासरीपेक्षा जास्त आर्द्रता आणि भारताच्या पश्चिम भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. याउलट, सरासरी पेक्षा कमी प्रवाहामुळे भारताच्या पश्चिम भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. मी हे पुढे समजावून स्पष्ट करतो.
माझा सरासरी पेक्षा जास्त आणि कमी प्रवाह, पश्चिमी प्रशांत आणि पूर्वीय हिंदी महासागरांच्या पातळीतील फरकावर अवलंबून असतो. महासागरांच्या पातळीतील फरक जितका मोठा असेल तितका प्रवाह वाढतो. प्रशांत व हिंदी महासागरातील समुद्री पातळीतील फरकामध्ये दरवर्षी काळात लक्षणीय बदल होत नाही. परंतु, दहा वर्षांच्या काळात या दोन महासागराच्या पातळीमधे लक्षणीय बदल होतो. हिंदी महासागरातील समुद्राच्या पातळीत आंतर-दशकीय काळात फारच कमी बदल होतो, त्यामुळे दोन महासागरांच्या पातळीतील फरक हा फक्त प्रशांत महासागराची पातळी नियंत्रित करतो. असंही म्हणता येईल की माझा आंतर-दशकीय काळात कमी-जास्त होणारा प्रवाह फक्त प्रशांत महासागरावर अवलंबून आहे.
२००५-२०१५ या दशकात पश्चिम प्रशांत महासागराची पातळी लक्षणीयरित्या जास्त असल्यामुळे माझा प्रवाह सरासरीपेक्षा जास्त होता; याच कालावधी मध्ये भारताच्या पश्चिमी भागात/पश्चिमी घाटात पावसाच्या नोंदी सरासरीपेक्षा जास्त पाऊस दर्शवितात, हा काळ माझ्या वरील स्पष्टीकरणाचे समर्थन देखील करतो. सध्याच्या दशकात, प्रशांत महासागराची समुद्र पातळी सरासरीपेक्षा कमी असेल असा अंदाज आहे. त्यामुळे माझा प्रवाह कमी होईल. परिणामी भारताच्या पश्चिमी भागात/पश्चिमी घाटात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असे मला वाटते.
आकृती क्र. ३ : हिंदी महासागरातील बाष्पीभवनात आणि भारतात पडणाऱ्या पावसात २००५-२०१५ या दशकात झालेला बदल. समुद्रातील बाष्पीभवनात आणि भारतावरील पर्जन्यात झालेल्या बदलाची तीव्रता आकृती शेजारील मोजपट्टी वरून लक्षात येईल.
भविष्यातील अंदाज
सामान्य माणूस: एक गोष्ट चांगली आहे की आंतर-दशकीय काळात तुझ्या प्रवाहांमध्ये होणारा बदल चांगल्या प्रकारे समजला आहे, आणि त्याचा उपयोग करून भारताच्या मान्सून मध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज लावता येऊ शकतो.
ITF: अरे! तो विचार तिथेच थांबव. भारतात पावसाळ्यात पडणारा पाऊस आणि माझ्यातील सध्याचे नाते मानवाला समजले असले तरी भविष्यात हे नाते बदलेल. शास्त्रज्ञ बराच काळ माझा अभ्यास करत आहेत आणि हवामानाचा भविष्यातील अंदाज दर्शवितो की हिंदी महासागराच्या पातळीतील आंतर-दशकीय बदलामध्ये लक्षणीय वाढ होईल, त्यामुळे हिंदी महासागराच्या पातळीचे, दोन महासागरांच्या भिन्नतेमध्ये असणारे योगदान वाढेल. हिंदी महासागराच्या पातळीत आंतर-दशकीय काळात होणाऱ्या बदलामध्ये होणारी वाढ ही वैज्ञानिक समुदायासाठी नवीन असेल. या बरोबर माझ्यामध्ये आंतर-दशकीय काळात होणारा बदल आणखी जटिल होईल आणि माझा अंदाज करणे आव्हानात्मक होईल.
सामान्य माणूस: मला वाटत होते की भारतीय पर्जन्यमानाचा अंदाज करणे आता अधिक अचूक होत आहे, पण तू माझी निराशा केलीस.
ITF: कारण हवामानातील परस्परसंवाद अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीचे आहेत. भविष्यातील हिंदी महासागराच्या पातळीतील बदलामध्ये होणारी वाढ हा त्यातील एक मुद्दा आहे आणि यासाठी काही प्रमाणात मानव जबाबदार आहे.
सामान्य माणूस: मला समजले की हा विषय कुठे चालला आहे ते. आता तू म्हणशील या सगळ्याला ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार आहे.
ITF: मला समजले की तू हे तिरकसपणे (व्यंग्यात्मकपणे) बोलला आहेस, परंतु खरोखर हे बदल ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत आहेत. ग्लोबल वार्मिंगमुळे तपांबरातील (Troposphere) हवा अधिक गरम होते, परिणामी वॉकर अभिसरणाचा वेग कमी होतो.
वॉकर अभिसरण , ज्याला वॉकर सेल म्हणूनही ओळखले जाते, हा हवेच्या अभिसरणाचा एक नमुना आहे जो पृथ्वीच्या विषुववृत्तीय प्रदेशातील असमान तापमानामुळे चालतो. 1930 च्या दशकात या पॅटर्नचा अभ्यास करणार्या गिल्बर्ट वॉकरच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे.
उष्णकटिबंधीय पॅसिफिक ओलांडून वाहणारे व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात: हवा पश्चिम पॅसिफिकच्या उबदार पाण्यामुळे हलकी होते व वर जाते, उंचावरून पूर्वेकडे वाहते आणि पूर्व पॅसिफिकवर खाली उतरते. वॉकरचे अभिसरण हिंद महासागरावर देखील होते मात्र उलट दिशेने आणि कमकुवत प्रमाणात होते.
आकृती क्र. ४ प्रशांत आणि हिंदी महासागरावर होणाऱ्या वॉकर अभिसरणाचा साधारण आराखडा.
हिंदी महासागरातील वॉकर अभिसरणाचा कमी होणारा वेग, पूर्वीय हिंदी महासागरातील तापनत (thermocline) उथळ करेल. त्यामुळे हिंदी महासागरावरील वातावरणात बदल होतील आणि परिणामी हिंदी महासागराच्या पातळीतील बदलात वाढ होईल.
चांगली गोष्ट अशी आहे की शास्त्रज्ञांना हवामान व्यवस्थेतील माझे महत्त्व समजण्यास सुरुवात झाली आहे, त्यामुळे जरी माझ्यामध्ये होणारे बदल अधिक क्लिष्ट होत गेले, तरीही, शास्त्रज्ञ माझ्यामध्ये होणारे बदल आणि त्याचा भारतीय मान्सूनच्या पावसावर होणाऱ्या परिणामांचा आगाऊ अंदाज बांधू शकतील.
सामान्य माणूस: मी चेष्टा करत होतो, व्यंग्यवादी नव्हतो; हवामान विज्ञानाबद्दल मी साशंक आहे कारण मी हवामान शास्त्राबद्दल फक्त बातम्या किंवा सोशल मीडियावर ऐकतो. मी किंवा इतर कोणताही सामान्य माणूस खऱ्या शास्त्रज्ञ किंवा जाणकार व्यक्तीशी अशी चर्चा करू शकत नाही. हवामान विज्ञान आणि पर्जन्यविज्ञाना बद्दल अधिक जाणून घेण्याचा काही मार्ग असावा अशी माझी इच्छा आहे.
बरं, ITF, मला आनंद झाला की आपली चर्चा झाली आणि मला भारतीय मान्सूनच्या पावसाबद्दल आणि समुद्रातल्या नदीबद्दल म्हणजे तुझ्या बद्दल काहीतरी शिकायला मिळालं. इतरांसोबतही अशाच अनेक चर्चा व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे.
लेखक : डॉ. विवेक शिळीमकर, पुणे विद्यापीठातून हवामानशास्त्रात पदव्युत्तर पदवी, होक्काईदो विद्यापीठात पीएच. डी, इन्फ्रा क्लाऊड टेक्नोलॉजी प्रा. लि. येथे कार्यरत.
इ-मेल : vivek.shilimkar@gmail.com
(कळीचे शब्द : इंडोनेशियन प्रवाह, समुद्राचे तापमान, समुद्री प्रवाह, स्वरड्रूप, हिंदी महासागर, प्रशांत महासागर, पश्चिम सीमा प्रवाह, वॉकर अभिसरण)