दिंडी (…शाळेमधली)
लोक पाहतायत हे लक्षात आलं, की आमच्यात उत्साह वाढायचा — आणि जर मुली समोरून चालल्या असतील, तर आम्ही दुप्पट जोरात ओरडायचो.

- Dr. Vivek Shilimkar
- 2 min read

आज रोजच्याप्रमाणे अभ्यासिकेत गेलो होतो. नेहमीसारखाच—शांत, एकटा. अभ्यासात लक्ष लागलेलं. अर्धा-पाऊण तास झाला असेल, तोच अचानक बाहेरून दिंडीतल्या गाण्यांचा आवाज कानावर आदळला. खिडकी उघडीच होती, त्यामुळे आवाज सरळ डोक्यात घुसला. जशी-जशी दिंडी जवळ येत गेली, तसा आवाजही वाढत गेला. शेवटी सहनशक्तीचा अंत झाला आणि मी शिव्या देत उठलो.
पण… बाहेरचं दृश्य पाहून पारा एकदम खाली आला. रोडवरून शाळकरी मुलांची दिंडी चालली होती.
जर ती “so-called” वारकऱ्यांची दिंडी असती, तर कदाचित मी खिडकी आपटून, कान झाकून वाचत बसलो असतो. पण इथे शाळेची दिंडी होती… आणि क्षणात शाळेचे दिवस आठवले.
शाळेत दरवर्षी एक छोटी पालखी वर्ग-वर्गांतून फिरायची. दुसऱ्या दिवशी शाळेजवळच्या परिसरात, वेगवेगळ्या सामाजिक संदेशांसह, वेगवेगळ्या दिंड्या एकामागून एक निघायच्या. भारताच्या विविधतेत एकतेचा संदेश देणारी दिंडी नेहमीच पालखीच्या पुढे असायची.
भले त्या मुलांना “विविधता” आणि “एकता” म्हणजे काय, याचा अर्थ माहीत नसेल, पण एक दिवस तरी नवीन कपडे घालायला, सजायला मिळणार — ह्या आनंदात सगळे दिंडीत उत्साहाने भाग घ्यायचे.
पहिलीपासून दहावीपर्यंतचा एक तरी मुलगा-मुलगी नक्कीच दिंडीत असायची. त्यांच्या पुढे असायचं लेझीमचं आणि ढोल पथक — पूर्ण शिस्तीत. कारण बरेच शिक्षक त्यांच्यासोबत चालायचे. त्यामुळे मस्तीला संधी मिळायची नाही.
पालखीच्या मागे असायची एखादा सामाजिक संदेश देणारी दिंडी — “मुलींना वाचवा”, “स्त्रीभ्रूण हत्या थांबवा” वगैरे.
मधेच एखादा माईकवरून ओरडायचा — “ज्ञानेश्वर माउली… ज्ञानराज माउली तुकाराम…” आणि मग मागून सगळे बेंबीच्या देठापासून ओरडायचे.
त्या ओरडण्यात ना भक्ती असायची, ना भावना — फक्त ओरडण्यातली मजा असायची!
पुढच्या दिंडीत प्रदूषण टाळण्याचा संदेश असायचा. “ध्वनी प्रदूषण टाळा!” आणि तो संदेश देताना मुलंच मोठ्याने ओरडून ध्वनी प्रदूषण करायची. अगदी विरोधाभासच.
आणि सगळ्यात शेवटी असायचो आम्ही — ९वी-१०वीचे टुकार.
आमच्या पर्यंत कधी माईक पोचायचाच नाही. मग आम्हीच आमच्या घोषणा द्यायचो — “वंदे मातरम! भारत छोडो! सायमन गो बॅक!”
स्वातंत्र्य मिळून पाव शतक उलटून गेलंय, तरी आम्ही तिथेच, घोषणा देत होतो. उगाचच… पण मजा यायची!
लोक पाहतायत हे लक्षात आलं, की आमच्यात उत्साह वाढायचा — आणि जर मुली समोरून चालल्या असतील, तर आम्ही दुप्पट जोरात ओरडायचो.
हे सगळं त्यांच्या त्रासासाठी नव्हे — तर आमच्या उत्साहासाठी. आणि एखादा शिक्षक जवळ आला, की मग एकदम “ज्ञानेश्वर माउली… तुकाराम!”
दिंडीचा दिवस प्रत्येकासाठी खास असायचा. कोणासाठी नवीन कपडे, कोणासाठी लेझीम, कोणासाठी घोषणा.
…आणि माझ्यासाठी? त्या आठवणी पुन्हा जिवंत करणं!