लिबियातील पूर संकटाचे सर्वसमावेशक विश्लेषण
सामान्यमाणूस आणि गल्फ स्ट्रीम यांच्यातील मजेशीर गप्पांमधून पृथ्वीवर उष्णता हस्तांतरित करणाऱ्या या मोठ्या प्रवाहाची भूमिका, वैशिष्ट्यं आणि त्याचे हवामानावर होणारे परिणाम समजून घेण्याचा हलकाफुलका आणि माहितीपूर्ण प्रयत्न.

- Dr. Vivek Shilimkar
- 5 min read

रविवारी, १० सप्टेंबर २०२३ रोजी लिबियाला धडकलेल्या डॅनियल वादळाने मुसळधार पाऊस आणला. मेडीकेन म्हणून ओळखल्या जाणार्या भूमध्यसागरीय चक्रीवादळासारख्या प्रणालीने २४ तासांच्या कालावधीत आफ्रिकेच्या उत्तर-पूर्व किनार्याच्या काही भागांमध्ये ४०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला. ‘संपूर्ण सप्टेंबरमध्ये साधारणतः १.५ मि.मी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशासाठी पावसाचा हा नवा विक्रम आहे.’ असे लिबियाच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने देखील म्हटले आहे. खालील आकृती डॅनिअल वादळामुळे ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या ३ दिवसांच्या कालावधीत कोणत्या भागात किती (मि.मि.) पाऊस झाला असेल याचा अंदाज उपग्रहाने निरीक्षण केलेल्या माहितीवरून देते. पण प्रत्यक्षात जमिनीवर पडलेल्या पावसाचे प्रमाण खूप जास्त होते.
आकृती 1: मेडिकेन वादळाने पाडलेल्या पावसाचा अंदाज. स्रोत : नासा
भूमध्यसागरातील वादळांना मेडिकेन या सामान्य नावाने संबोधले जाते. Mediterranean-Hurricane या इंग्रजी शब्दापासून मेडिकेन (Medicane) हा शब्द प्रचलित झाला. १० सप्टेंबर २०२३ रोजी लिबियासह तीन देशांना भूमध्यसागरीय डॅनियल वादळाने कसे प्रभावित केले हे प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे.
या वादळाचा सर्वात मोठा फटका बसला तो आफ्रिकेतल्या लिबिया देशातल्या डेरना या शहराला. डेरना शहरात ४०० मिमी पाऊस पडला आणि १० सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात पूर आला. पुरामुळे आजपर्यंत डेरना शहरातील अंदाजे १८००० ते २०००० लोकांचा मृत्यू झाला आहे. २६ जुलै २००५ रोजी मुंबईमध्ये डेरना शहरामध्ये पडलेल्या पावसापेक्षा दुपटीपेक्षा जास्त पाऊस पडला (९११ मिमी) होता, तरी मृतांचा आकडा १००० च्या आसपास होता. यामुळे त्वरित प्रश्न उद्भवतो: डेरनामध्ये एवढा पूर कशामुळे आला असेल?
आकृती २: डेरना शहराचा पुरा आधीचा उपग्रहाने काढलेला फोटो. स्रोत : Planet Labs PBC
आकृती ३: डेरना शहराचा पुरा नंतर उपग्रहाने काढलेला फोटो. स्रोत : Planet Labs PBC
लिबियामध्ये पूर कशामुळे आला याचा सारांश
घटक | माहिती |
वादळ | १० सप्टेंबर २०२३ रोजी लिबियासह तीन देशांना भूमध्यसागरीय वादळाने प्रभावित केले. |
भौगोलिक परिस्थिती | डेरना शहर, डेरना नावाच्याच नदीच्या खोऱ्यात वसलेलं असल्याने, विशेषत: पूर येण्याची शक्यता होती. |
कमकुवत बंधारे | डेरनाजवळील प्रत्येकी २३० फूट उंचीचे दोन बंधारे वादळाच्या प्रभावामुळे कोसळले. |
भौगोलिक परिस्थिती
डेरना शहराच्या उत्तरेला भूमध्यसागर आणि दक्षिणेला जेबेल अख्दार नावाची डोंगररांग आहे. जेबेल अख्दार या अरेबिक शब्दाचा, मराठीत अर्थ हिरवेगार डोंगर असा होतो. त्यामुळे अशा नावाच्या एका पेक्षा जास्त डोंगररांगा उत्तर आफ्रिकेत, जिथे भरपूर पाऊस पडतो, तिथे आहेत. डेरना शहर अशाच हिरव्यागार डोंगररांगेतुन वाहणाऱ्या ‘डेरना’ नावाच्याच नदीच्या खोऱ्यात वसलेलं आहे. डॅनिअल वादळाने या डोंगर रांगेत भरपूर पाऊस पाडला, डोंगररांगांत झालेल्या जोरदार पावसाचे पाणी डोंगरांनी डेरना नदीतून शहराच्या दिशेने वळवले.
कमकुवत बंधारे
डोंगरांनी डेरना नदीतून शहराच्या दिशेने वळवलेले पाणी, नदीवर असलेल्या २ बंधाऱ्यात साठले. अबू मन्सोर बंधारा जो शहरापासून १४ किलोमीटर जेबेल अख्दार डोंगरांच्या जवळ आहे, त्यामध्ये ८० कोटी घनफूट / २२.६५ अब्ज लिटर / ०.८ टीएमसी (thousand million cubic) एवढे पाणी साठवून ठेवायची क्षमता होती. तर शहराजवळ असलेल्या डेरना बंधाऱ्याची क्षमता ५ कोटी घनफूट / १.५ अब्ज लिटर / ०.०५ टीएमसी एवढी होती.
आकृती ४: डेरना शहराची भौगोलिक स्थिती दाखवणारा फोटो. स्रोत: Google Earth
जसा पाऊस वाढला तसा, पावसाच्या पाण्याने अबू मन्सोर बंधारा (पहिला बंधारा) भरला, पाणी बंधाऱ्यांवरून वाहू लागले आणि बंधारा फुटला. २२.५ अब्ज लिटर पाणी डेरना शहराच्या दिशेने वाहिले आणि डेरना बंधारा (दुसरा बंधारा) देखील फुटला आणि डेरना शहरात पूर आला. २२.५ अब्ज लिटर वाचताना खूप मोठा आकडा वाटतो पण महाराष्ट्रातल्या धरणांबरोबर या आकड्याची तुलना केल्यावर खरंच हे आकडे किती लहान आहेत याची कल्पना येईल. खालील टेबलमध्ये महाराष्ट्रातली धरणे आणि त्याांची क्षमता दशावली आहे. ते आकडे वाचल्यावर सहाजिक प्रश्न पडतो की, जर पाणी एवढे कमी होते तरी बंधारे फुटले कसे?
महाराष्ट्रातली धरणे आणि त्यांची क्षमता
धरण | पाणी साठवण्याची क्षमता (अब्ज लिटर/टीएमसी) |
खडकवासला | ५५.२/१.९४ |
वरसगाव | २६१/९.२२ |
भाटघर | ६७२.५/२३.७५ |
कोयना | २९८१/१०५.२७ |
दोन्ही बंधारे चिकणमाती, खडक आणि मातीपासून बांधलेले होते. यामध्ये सिमेंट कुठेच वापरलेले नव्हते. शहराला अचानक येणाऱ्या पुरापासून वाचवणे हे दोन्ही बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य होते, आणि ही त्या परिसरात सामान्य गोष्ट आहे. बंधाऱ्यांच्या मागे साचलेल्या त्या पाण्याचा उपयोग खाली येणाऱ्या पिकांच्या सिंचनासाठी केला जात असे. शहराला वारंवार पूर आले होते, दोन्ही बंधाऱ्यांची अनेक वर्षे देखभाल केली गेली नव्हती त्यामुळे दोन्ही बंधारे जीर्ण झाले होते.
१९८६ मध्ये या प्रदेशात आलेल्या जोरदार वादळात बंधाऱ्यांचे मोठे नुकसानही झाले आणि एका दशकाहून अधिक काळानंतर लिबियन सरकारने दोन्ही बंधाऱ्यांच्या केलेल्या अभ्यासात त्यांच्या संरचनेत भेगा आणि तडे असल्याचे दिसून आले. मात्र त्या नंतरही बंधाऱ्यांमध्ये सुधारणा किंवा सिमेंटचे धरण बांधले गेले नाही. परिणामी अपेक्षेपेक्षा मोठ्या पावसामुळे बंधारे फुटले आणि शहरात पूर आला. पुरामुळे बऱ्याच इमारती पडल्या, पुराच्या पाण्याच्या लोंढ्यात जे काही आले ते सर्व भूमध्यसागरात वाहून गेले.
भूमध्यसागरातील वादळांमुळे जे काही नुकसान आज पर्यंत झाले आहे, त्यात डॅनियल वादळाने सर्वात जास्त नुकसान आणि मनुष्यहानी केली. डेरना शहराची उपग्रहाने टिपलेली पुरा आधीची आणि नंतरची छायाचित्रे पाहिल्यावर याची कल्पना येईल.
आकृती ५: डेरना शहराचा पुरा आधीचा उपग्रहाने काढलेला फोटो. (२ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर)
स्रोत : Planet Labs PBC
आकृती ६: डेरना शहराचा पुरा नंतर उपग्रहाने काढलेला फोटो. (२ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर) स्रोत : Planet Labs PBC
आकृती ७: डेरना शहराचा पुरा आधीचा उपग्रहाने काढलेला फोटो. (२ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर) स्रोत : Planet Labs PBC
आकृती ८: डेरना शहराचा पुरा नंतर उपग्रहाने काढलेला फोटो (२ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर). स्रोत : Planet Labs PBC
बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी करावे लागणारे बदल
लिबियाच्या हवामानावर उष्ण रखरखीत सहाराचे वर्चस्व आहे, परंतु हा भाग भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीवर असल्यामुळे त्याची तीव्रता कमी आहे. भूमध्यसागरीय किनाऱ्याजवळ असल्यामुळे या प्रदेशाचे हवामान थंड हिवाळ्यात पावसाचे आणि उन्हाळ्यात कोरडे अशाप्रकारचे आहे. सर्वात उष्ण महिने जुलै आणि ऑगस्ट आहेत. पावसाचे प्रमाण इकडे कमी असल्याकारणामुळे कदाचित बंधारे भक्कम बांधण्याकडे त्यांच्या सरकारचा कल नसावा. त्या बंधाऱ्यांमधून हवे तेव्हा पाणी सोडण्याची देखील व्यवस्थित सोय नव्हती.
आकृती 9: अबू मन्सोर बंधारा (पुराने बंधारा फुटण्याआधीचा फोटो) स्रोत : Google Earth
बदलत्या हवामानात चक्रीवादळांची संख्या आणि तीव्रता दोन्ही वाढत असल्याचे बऱ्याच संशोधनातून पुढे आले आहे. फक्त मेडिकेन वर शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात सुद्धा हीच गोष्ट समोर आली आहे की मेडिकेनची तीव्रता वाढत्या तापमानात वाढत जाणार आहे. त्याचेच वास्तविक उदाहरण आणि परिणाम डॅनिअल वादळाने दाखवून दिले. बदलत्या हवामानात अशा घटना अजून घडणार हे लक्षात घेऊन विकासकामे करणे आता गरजेचे झाले आहे. चिकणमाती, खडक आणि मातीपासून बनवलेले बंधारे या हवामानात तग धरू शकणार नाहीत.
धरणांचा उपयोग शेतीच्या सिंचनासाठी आणि वीज निर्मितीसाठी तर सर्वत्र स्वीकार्य आहे. मात्र धरणांची, पूर नियंत्रणात आणण्याची भूमिका नेहमीच कमी दुर्लक्षित झाली आहे. डेरना सारख्या शहरात जिथे डोंगर शहराकडे पाणी वळवतात, अशा ठिकाणी चांगल्या गुणवत्तेची धरणे असणे फार गरजेचे आहे. चांगल्या गुणवत्तेच्या सिमेंट आणि खडकाच्या धरणांतून पाणी हवे तेव्हा सोडता येईल अशी सोय असेल तेव्हा पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन पाणी धरणांतून सोडता येईल आणि पूरसदृश्य परिस्थिती रोखता येईल. या शिवाय, पावसाच्या अंदाजाचे तंत्र सुधारणे, ही सुद्धा तितकीच किंवा त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची बाब आहे. पाऊस किती पडणार आहे याचा आधीच अंदाज आल्यास धरणांमधून पुरेसा विसर्ग आधीच करून जसा पाऊस पडेल तसा धरणात पुन्हा पाण्याचा संचय करून किंवा कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सतत चालू ठेवल्यास पूर परिस्थिती नक्कीच रोखता येते.