चक्रीवादळे वळत आहेत — आपली धोरणे त्यानुसार वळणार का?

पूर्वी बंगालच्या उपसागरातील बहुतेक चक्रीवादळे भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये धडकत असत. मात्र CMIP6 उच्च रिझोल्यूशन हवामान मॉडेल्सवर आधारित २०१५ ते २०५० या कालावधीतील अंदाज दर्शवतात की चक्रीवादळांच्या मार्गांमध्ये हळूहळू उत्तरेकडे झुकणारा बदल होत आहे. या बदलामुळे चक्रीवादळे आता अधिकाधिक ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दिशेने सरकण्याची शक्यता वाढत असल्याचे स्पष्ट होते.

Dr. Vivek Shilimkar avatar
  • Dr. Vivek Shilimkar
  • 4 min read

चक्रीवादळे वळत आहेत — आपली धोरणे त्यानुसार वळणार का?

हवामान बदलाकडे पाहण्याची आपली सवय

हवामान बदलाबद्दल बोलताना आपण नेहमी आकड्यांच्या मागे धावतो. तापमान किती वाढले, पर्जन्यमान किती बदलले, चक्रीवादळांची संख्या वाढली की घटली — चर्चा याच चौकटीत अडकून राहते. ही चौकट सोयीची आहे, कारण ती मोजता येते, मांडता येते आणि शीर्षकात बसवता येते. पण हीच चौकट आपल्याला एक महत्त्वाचा बदल दिसू देत नाही.

चक्रीवादळांचा प्रश्न फक्त “किती येतील” हा नसतो. तो “कुठे जातील” हा असतो. आणि हा दुसरा प्रश्न हवामान बदलाच्या चर्चेत अजूनही दुय्यम ठरतो आहे.

बंगालचा उपसागर याचे ठळक उदाहरण आहे. दशकानुदशके या उपसागरातील चक्रीवादळांनी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर धडक दिली. त्यामुळे आपली मानसिकता, आपत्ती व्यवस्थापनाची रचना आणि धोरणात्मक तयारी याच गृहितकावर उभी राहिली. पण आता चित्र हळूहळू बदलत आहे. भविष्यातील हवामान अंदाज असे सूचित करतात की अधिक चक्रीवादळे पश्चिमेकडे न जाता उत्तर-ईशान्य दिशेने वळत आहेत.

या लेखातील निष्कर्षांचा वैज्ञानिक पाया CMIP6 (Coupled Model Intercomparison Project – सहावा टप्पा) मधील उच्च रिझोल्यूशन हवामान मॉडेल्सवर आधारित आहे. CMIP म्हणजे काय आणि CMIP5/CMIP6 मध्ये काय फरक आहे, याबद्दल अधिक माहिती इथे वाचा: CMIP6 म्हणजे काय? इतिहास आणि CMIP5ची माहिती.

हा बदल मोठ्या आवाजात होत नाही. चक्रीवादळांची संख्या फारशी बदलत नाही, त्यामुळे “धोका वाढला” असा थेट निष्कर्ष काढला जात नाही. पण धोका नेहमी वाढतोच असे नाही — तो अनेकदा स्थलांतरित होतो. आज जो धोका भारताच्या उत्तर-पूर्व भागावर होता, तो उद्या भारताच्या ऊत्तरेकडील किनाऱ्यावर (ओडीसा-पश्चिम बंगाल) अधिक तीव्र स्वरूपात जाणवू शकतो.

म्हणूनच हवामान बदलाकडे पाहण्याची आपली सवयच बदलण्याची गरज आहे. आकड्यांपलीकडे जाऊन दिशा, वेळ आणि स्थान यांच्यात होणारे सूक्ष्म बदल ओळखण्याची सवय आपल्याला लावावी लागेल.

समुद्र गरम होतोय, पण चक्रीवादळे आकाशाकडे पाहून वळतात

सार्वजनिक चर्चेत एक साधी समजूत रूढ झाली आहे — समुद्र गरम झाला, म्हणून चक्रीवादळे बदलत आहेत. ही समजूत अर्धसत्य आहे. समुद्राचे तापमान चक्रीवादळांच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे असते, हे खरे आहे. पण चक्रीवादळांची दिशा ठरवण्यात समुद्रापेक्षा आकाशाचा वाटा अधिक असतो.

चक्रीवादळ हे केवळ समुद्रावर फिरणारे वारे नाहीत; ते वायुमंडलाच्या अनेक थरांशी संवाद साधत पुढे सरकतात. जमिनीपासून बऱ्याच उंचीवर वाहणारे वारे चक्रीवादळांसाठी मार्गदर्शकासारखे काम करतात. भविष्यात या वरच्या थरातील वाऱ्यांची दिशा आणि ताकद बदलत आहे — आणि हाच बदल चक्रीवादळांना वेगळ्या वाटेने नेत आहे.

हे वारे चक्रीवादळांना पश्चिमेकडे जाण्यापासून अडवतात आणि त्यांना उत्तरेकडे वळवतात. हा बदल इतका सूक्ष्म आहे की तो उपग्रह नकाशावर लगेच दिसत नाही, पण दशकांच्या पातळीवर तो स्पष्ट होतो. हीच हवामान बदलाची खरी ताकद आहे — तो हळूहळू, पण सातत्याने निसर्गाची दिशा बदलतो.

अजून धक्कादायक बाब म्हणजे हे बदल स्थानिक नाहीत. युरोप आणि भूमध्य समुद्राच्या आसपास घडणाऱ्या वातावरणीय हालचाली भारताच्या आसपासच्या वाऱ्यांवर परिणाम करतात. पृथ्वीची हवामान व्यवस्था एखाद्या सैल जोडलेल्या यंत्रासारखी नसून घट्ट विणलेल्या जाळ्यासारखी आहे. एका ठिकाणी हललेली दोरी दुसऱ्या टोकाला ताण निर्माण करते.

याचा अर्थ स्पष्ट आहे — हवामान बदल ही केवळ स्थानिक समस्या नाही. ती जागतिक आहे, आणि तिचे परिणाम सीमारेषा ओलांडून पसरतात.

बदलते मार्ग म्हणजे बदलती जबाबदारी

चक्रीवादळांचे मार्ग बदलत असतील, तर आपली जबाबदारीही बदलली पाहिजे. केवळ जुन्या अनुभवांवर आधारित आपत्ती व्यवस्थापन योजना आता पुरेशा ठरणार नाहीत. कारण भविष्यातील धोके भूतकाळासारखे वागतीलच, याची हमी नाही.

ओडीसा आणि पश्चिम बंगाल साठी हा बदल विशेष चिंताजनक आहे. दाट लोकसंख्या, नीच भूभाग आणि मर्यादित संसाधने यामुळे चक्रीवादळांचा थोडासा दिशाबदलही तिथे मोठे नुकसान घडवू शकतो. काही भागांमध्ये थेट धडक कमी झाली, तरी पर्जन्यमानाचे स्वरूप, पूर येण्याची वेळ आणि वादळलाटांची दिशा बदलू शकते.

हवामान बदल आपल्याला रोज एखादी मोठी आपत्ती देऊन इशारा देत नाही. तो अनेकदा शांतपणे, दिशेतील बदलांच्या रूपाने आपल्याला सांगत असतो की जग जसं आपण ओळखत होतो, तसं राहणार नाही. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांचे बदलते मार्ग हा असाच एक शांत, पण स्पष्ट इशारा आहे. तो ऐकायचा की दुर्लक्षित करायचा, हा निर्णय आता आपलाच आहे.

या सगळ्याचा एकत्रित अर्थ असा की हवामान बदलाच्या काळात धोके सरळ रेषेत वाढत नाहीत; ते वळण घेतात. आणि जेव्हा धोके वळतात, तेव्हा धोरणांनाही वळावे लागते.

आजचा प्रश्न असा आहे — आपण अजूनही कालच्या नकाशांवर उद्याची तयारी करणार आहोत का? की बदलत्या निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी आपली दृष्टी, योजना आणि राजकीय इच्छाशक्ती बदलणार आहोत?

हे संशोधन Scientific Reports या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. हे संशोधन पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) येथील Climate Variability and Prediction विभागातील ऋषिकेश अडसुळ, विनीत कुमार, अनंत पारेख आणि सी. ज्ञानसीलन यांनी केले आहे. पूर्ण संशोधन इथे वाचा - https://www.nature.com/articles/s41598-026-35482-w


Tags: #BayOfBengal #Cyclone #SST #OHC #RapidIntensification #StormSurge #ENSO #IOD #Odisha #WestBengal #Andhra

Comments

Dr. Vivek Shilimkar

Written by : Dr. Vivek Shilimkar

Site Reliability Engineer | Climate Scientist | Nature Lover

Recommended for You

एल निनो – ला निनाचा भारतीय हवामानावर परिणाम: बातम्यांपलीकडचे सत्य

एल निनो – ला निनाचा भारतीय हवामानावर परिणाम: बातम्यांपलीकडचे सत्य

एल निनो आणि ला निनाचे भारतीय पावसाळ्यावर आणि हवामानावर होणारे परिणाम, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सोप्या भाषेत समजावून सांगितले.

Indonesian Throughflow: River in the ocean that affects Indian Monsoon rainfall

Indonesian Throughflow: River in the ocean that affects Indian Monsoon rainfall

This is the story of a river that can affect rainfall in India during monsoon season. Unlike the rivers on the land, this river flows in the ocean