पहिली सिगारेट
तिच्या डोळ्यांपुढचा "विवेक" — जो कधी वर्गात शांत बसायचा, चर्चा करायचा, धाडसी पण संयमी वाटायचा — तो, सिगारेटच्या धुरा बरोबर एका क्षणात उडून गेला असेल का? असो… विचार करून काही बदलणार नव्हतं. बोलून झालं, निघालो, आणि सिगारेटचा धूर जसा सोडून दिला… तसाच तो विचारही.

- Dr. Vivek Shilimkar
- 2 min read

आज ताम्हीणीला जायची अजिबात इच्छा नव्हती.
मी गेलो होतो ते फिरायला म्हणून नाही, तर जमीरने आग्रह केला म्हणून. पण खरं सांगायचं तर, अपेक्षा नसताना खूप मजा आली… आणि काही अनपेक्षित गोष्टीही घडल्या.
सगळ्यात आधी अनपेक्षित वाटलेली गोष्ट म्हणजे ‘मोसमी’ आली! आणि ईशा — जी सगळ्यांना एकत्र यावं म्हणून सिंहगडचा प्लॅन करत होती — तिने अचानक मोबाईलच बंद केला. काहीतरी प्रॉब्लेम असेलच, नाहीतर असं ती कधीच करणार नाही.
मुळशीच्या पुढे एका धबधब्यावर थांबलो. नेहमीप्रमाणे एकमेकांना भिजवणं, फोटो काढणं — सगळं झालं. पण आज मनात वेगळंच काही आलं. एकदाच मिळणारं आयुष्य आहे, असं वाटलं… आणि त्या यादीतली एक गोष्ट — सिगारेट ओढून बघणं — आज करून टाकावीशी वाटली.
मी आणि रोहित “चहा प्यायला” बाहेर पडलो. पण धाडस नाही झालं. नंतर, डोंगरवाडीजवळच्या देवराईत थांबल्यावर, आम्ही पुन्हा एकदा “चहा प्यायला” हॉटेलमध्ये गेलो. या वेळी धाडस केलं — एक सिगारेट घेतली.
दुसऱ्याच झुरक्यावर खोकला आला. कारण पहिल्यांदाच धूर आत ओढला होता. नंतरही ३-४ प्रयत्न झाले, पण काही केल्या मला सिगारेट ओढता आली नाही. प्रत्येक वेळी धूर खोकल्यातूनच बाहेर यायचा.
आयुष्यात पहिल्यांदाच सिगारेट हातात घेतली… आणि नेमकी त्या क्षणी घडली दुसरी अनपेक्षित गोष्ट. १०वी मधली माझी एक जुनी मैत्रीण — मनीषा — आणि तिचा आताचा ग्रुप त्या हॉटेलमध्ये जेवायला आला होता.
माझ्या नशिबाने मला काही सिगारेट ओढता आलं नाही, त्यामुळे मी ती टाकून दिली आणि गाडीपाशी जाऊन उभा राहिलो. मनीषा नेमकी माझ्याकडेच पाहत होती. त्यामुळे बोलणं भागच पडलं. रोहित थोडा बाजूला गेला आणि आम्ही दोघं बोललो.
५ वर्षांनी ती भेटली. बोलून छान वाटलं… पण एक गोष्ट मात्र मनात राहून गेली.
मी जरी व्यसनी नसलो, सिगारेट ओढत नसलो, तरी… तिने मला सिगारेट ओढताना पाहिलंय.
तिच्या डोळ्यांपुढचा “विवेक” — जो कधी वर्गात शांत बसायचा, चर्चा करायचा, धाडसी पण संयमी वाटायचा — तो, सिगारेटच्या धुरा बरोबर एका क्षणात उडून गेला असेल का?
असो… विचार करून काही बदलणार नव्हतं.
बोलून झालं, निघालो, आणि सिगारेटचा धूर जसा सोडून दिला… तसाच तो विचारही.