मी भारत बोलतोय…
कोणीच कोणाशी बोलत नव्हता, बहुदा सर्वजण एकंच विचार करत असावेत कि, “मी देशासाठी काय केलंय?” सगळे काहीच न बोलता आपल्या परतीच्या मार्गाला लागले.

- Dr. Vivek Shilimkar
- 5 min read

१५ ऑगस्ट चा दिवस होता. बरेचजण स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी कॉलेजमध्ये एकत्र आले होते. कोणीतरी भारताच्या नकाशाची आउटलाइन फळ्यावर काढायचा चांगला प्रयत्न केला होता. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरु झाला आणि एक तासात संपला सुद्धा. मग सुरु झाली, ती दरवर्षीची गाणी. ” जहां डाल डाल पार सोने कि, चिडिया करती हे बसेरा l वो भारत देश हे मेरा, वो भारत देश हे मेरा… ll ”
(तेवढ्यात कोणीतरी बोललं) अरे कसला “देश” अन कसली “सोने कि चिडिया”, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आली की, तेवढ्यापुरती गाणी वाजवता आणि दुसऱ्याच दिवशी रस्त्यात पडलेला तिरंगा पायाखाली तुडवता…!! कोणीतरी गाणं बंद केल. बोलत होता तो भारताचा नकाशा होता, अर्थात “भारतच…”
“१५ ऑगस्ट १९४७ तुमच्या दृष्टीने हा स्वातंत्र्य दिवस असला तरी माझ्या दृष्टीने तो दिवस म्हणजे केवळ सत्तांतर होत. कारण १६-१७ व्या शतकात जेव्हा इंग्रजांनी माझ्यावर सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली तेव्हा राज्यकारभार करणारा एक असा कोणी नव्हताच. मराठे, मोघल, निजाम, आदिलशहा एकमेकांशी लढत होतेच. प्रत्येकजण आपापली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करा होता. यात इंग्रज ताकदवर होते, त्यांनीच सत्ता स्थापन केली. त्यावेळी कोणाला वाटलेच नाही, आपण पारतंत्र्यात जात आहोत, आपले राष्ट्र कोणी बाहेरील सत्ता बळकावत आहे. इंग्रज यायच्या आधी इथे केवळ एक फुटकळ समाज राहत होता असेच मी म्हणेन. तुमच्या पुण्यातल्या शनिवारवाड्यावरचा भगवा उतरवून युनियन ज्यक चढवणारा बाळाजी पंत नातू हा अस्सल मराठीच. यावरूनच त्यावेळच्या लोकांची मन:स्थिती तुम्हाला कळेल. देशप्रेम, देशभक्ती ही भावना लोकांत त्यावेळी नव्हतीच. ती नंतर इंग्रजांनीच सुरु केलेल्या शाळांमधून निर्माण झाली, आणि इंग्रजांबरोबरच निघून गेली. स्वातंत्र्यात जन्मलेल्या पिढीमध्ये देशप्रेमाचा अंशही दिसत नाही.तुम्हाला स्वातंत्र्य मिळाल खरं; पण लोकांची प्रवृत्ती मात्र बदलली नाही. देशासाठी काहीतरी करावं असं क्वचितच कोणालातरी वाटत, त्यामुळे १५ ऑगस्ट हा जरी स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा होत असला, तरी माझ्या मते हा दिवस म्हणजे केवळ एक सत्तांतर होत. हे सत्तांतर फार मोलाच ठरलं. १९५२ सालच्या पहिल्याच निवडणुकीत प्रौढ मतदानाचा हक्क देऊन क्रांतिकारी निर्णय घटना लिहिणाऱ्यांनी घेतला; पण आज पर्यंत तुम्हाला तुमच्या हक्कांची, तुमच्या कर्तव्यांची जाणीवच नाही. देशप्रेमाची भावना फक्त दहशतवादी हल्ला किंवा माझ्यावर कुठल संकट आलं तरच जागृत होते. इतरवेळी कुठे जाते कोणास ठाऊक? त्यामुळे क्षमता असूनही माझी गणना विकसित देशात होत नाही. यास फक्त सामान्य नागरिकाच दोषी नाहीत. कारण राज्यकारभार करणारे राजकारणीच प्रथम स्वतःचा, मग पक्षाचा आणि जमलंच तर माझा विचार करतात. यात सर्वांचाच सहभाग आहे असं नाही; पण तरीही एक नासका आंबा पूर्ण पेटी खराब करतो, त्यातलीच हि बात. नीरज चौधरी सारखे क्रांतिकारक – कि ज्यांच्या ज्ञानाचा आणि इंग्रजी भाषेचा इंग्रज देखील हेवा करायचे अशा भूमीपुत्राने आपल्या आत्मचरित्राच्या शेवटच्या लेखात “हा देश देशच नाही केवळ फुटकळ समाज आहे” असे लेखन केले आहे. इतकेच नाही, तर सत्तांतरानंतर (स्वातंत्र्यानंतर) २५ वर्षात गुंड, लुटारू, कायदा खिशात घालणारे, जातीभेद, विषमता मानणाऱ्यांच्या हातात माझी सत्ता जाईल असेही ते म्हणाले होते आणि आज २५ नाही पण ६० वर्षांनंतर तीच परिस्थिती आली आहे. आज कोणत्याही व्यक्तीला आधी अटक करून नंतर कोणतेही कागदपत्र, खोटे पुरावे जोडून, त्या व्यक्तीला शिक्षा केली जाते. ब्रिटिशांनी कधीच कायदा सोडून कारभार केला नव्हता. इतकेच नाही, तर रेल्वे, टेलिग्राफ, बँकिंग, राज्यकारभार आणि महत्वाच म्हणजे शिक्षण या सर्वांची सुरुवात इंग्रजांनी केली, मग हे शोषणकर्ते होते कि आधुनिकता देणारे? इंग्रज कसे श्रेष्ठ हे मला दाखवून द्यायचे नाही, तुमची व्यथा दाखवून देतोय.
आज पर्यंत बोटावर मोजण्याइतक्याच नेत्यांनी माझ्या विकासासाठी आयुष्य वेचलं. इंदिरा गांधीनी दहशतवाद संपवण्यास पाऊल उचललं; पण त्यांच्याच सुरक्षा रक्षकाने त्यांना गोळ्या घातल्यावर दहशतवादाची मुळेकुठपर्यंत पोचली आहेत हे लक्षात आलं. तेव्हापासून ते आज पर्यंत दहशतवादी हल्ले होताच राहिले. ते फक्त दहशतवादी हल्ले नव्हते, तर तुम्हा-आम्हाला (राष्ट्राला) कोलमडून टाकायचे प्रयत्न होते आणि आजही ते चालूच आहेत; पण आज पर्यंत तुम्हाला दहशतवाद संपवता आला नाही. दहशतवाद हा जरी मोठा वैरी असला, तरी भ्रष्टाचारासारखा दुसरा वैरी कोणीच नाही. राजकारण्यांच्या भ्रष्ट आचरणामुळे मी जगावर सत्ता गाजवू शकत नाही. अरे जसे तुम्ही या नेत्यांना गादीवर बसवू शकता तसे उतरवूही शकता हि गोष्टच मुळी तुम्ही विसरला आहात. काहीजण तर मतदान पण करत नाहीत. मतदानाची सुट्टी “हॉलिडे” म्हणून साजरी करतात आणि नंतर नेते काहीच काम करत नाहीत म्हणून ओरडत राहतात.
“या देशाचे काही भले होणार आहे का?” असे ओरडून दुसऱ्या देशाची चाकरी करणारे लोक… मुख्यत: डॉक्टर्स, इंजिनिअर्स आणि प्रामुख्याने शिक्षक हेच विसरून गेलेत कि ठरवलं तर देश घडवणारे तेच आणि या देशाचे काही होणार नाही या विचाराने दुसऱ्या देशाची चाकरी करून माझ्या विकासाचा वेग कमी करणारे सुद्धा तेच. या सर्व अधोगतीस जबाबदार आहे ती म्हणजे, माझ्याविषयी तिळमात्रही नसलेली प्रेमाची भावना. ब्रिटिशांनी सत्ता तुमच्यावर सोपवून एवढी वर्षे लोटली, तरी माझ्याविषयी प्रेमाची भावना तुमच्यात निर्माण झाली नाही. तुम्ही एका राष्ट्रात राहता हि समज निर्माण व्हायला इंग्रज यावे लागले आणि त्यानंतर तुम्ही जागे झालात, मला स्वतंत्र करण्यासाठी. आता देशप्रेम, देशभक्ती व माझ्यासाठी काही करावे अशी भावना निर्माण व्हायला कोणी दुसरा माझ्यावर चालून यायची वाट पहावी लागेल काय? तशी वेळही येऊ देऊ नका, वेळीच जागे व्हा. नाहीतर दहशतवादी दिवाळीत फटके वाजवल्याप्रमाणे सहजंच बॉम्ब स्फोट करत आहेत आणि त्यांना मदत करणारे काही पडद्याआड नाहीत.
अशा बऱ्याच गोष्टी आहेत, कि ज्यांचा पूर्ण जग हेवा करेल, पण तुम्हाला त्या ठाऊक नाहीत. काही क्षेत्रात आपण जगात सर्वोच्च स्थानावर आहोत; पण तुम्हा भूमिपुत्रांची एक वाईट सवय आहे ती हि कि, एखाद्या गोष्टीला किती महत्व द्यावं हे तुम्हाला अजिबात काळात नाही, आणि त्यात NEWS वाले त्यांचा TRP वाढवण्यासाठी तुमच्या डोक्यात काहीही भरत राहतात. एखादी गोष्ट डोक्यावर घेतली कि मान मोडेपर्यंत तुम्ही तिला खाली ठेवत नाही आणि नंतर शोक करत बसता, यामुळे तुमच्यापुढे मी व्यथा मांडली. तुमच्यात माझ्याविषयी प्रेम आहे, ती प्रेमाची आग सतत धगधगत ठेवा. तरच माझे आणि तुमचे काही होऊ शकेल. शेवटी एवढंच सांगतो, जसे तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढता तशी कर्तव्ये सुद्धा पार पाडा. नियमांचे पालन करा. मग जगावर आपला दबदबा वाढवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.”
भारत थांबला, सगळीकडे भयाण शांतता होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हता, बहुदा सर्वजण एकंच विचार करत असावेत कि, “मी देशासाठी काय केलंय?” सगळे काहीच न बोलता आपल्या परतीच्या मार्गाला लागले.